Friday, 17 August 2018

"सेवानिवृत्ती"

      40 वर्षे काम करून आज आनंदचे बाबा निवृत्त होत होते. आनंद दुःख अश्या संमिश्र भावनेत सर्व पार पडत होत. आनंद आणि त्याच्या बहिणीची एकच धावपळ चालू होती. बाबांच्या फोटोंची चित्रफीत बनवून त्यांना बाबांना सरप्राईस द्यायचं होत. त्यांना आजच्या दिवसाची आठवण म्हणून खूप खास काहीतरी द्यायचं म्हणून गिफ्ट काय द्यायचं हे ठरवणं चालू होतं. आणि खरंच आहे, आपण आपल्या आयुष्याची 40 वर्षे काम करतो . रोजचं वेळापत्रक बनलेलं असतं. सकाळी उठल्यापासून रात्री झोपे पर्यंतच हे  वेळापत्रक आता पाळावे लागणार नाही म्हणून आनंद मानायचा की आता या वेळेत नेमकं करायचं काय याचा विचार करायचा. 

     जसं घरी आपलं एक कुटुंब असतं तसच कामाच्या ठिकाणी पण आपलं एक कुटुंब तयार होत. दिवसाचा खूप मोठा भाग आपण कामाच्या ठिकाणी घालवतो.  आपले मित्र मैत्रिणी , त्यांच्या सोबत रंगलेल्या गप्पा या सर्वांची आपल्याला एवढी सवय झालेली असते की त्याशिवाय आपलं आयुष्य अपूर्ण वाटावं. घरात कोणाशी भांडण झालं तर आपण अबोला धरतो, पण ऑफिस मध्ये कोणाशी कुरबुर झाली तर आपण न बोलता नाही राहू शकत. अशीच अव्यक्त प्रेमाची , आपुलकीची नाती आपल्या नकळत तयार होतात.
ऑफिस बंद झालं म्हणून काय झालं, आपण भेटतच राहूया ना! हे किती अमलात येत हे सांगता येत नाही. पण खरंच परत तो माहोल राहत नाही. कधी कधी खूप एकटेपणा जाणवतो, कामावर रुजू असताना न मिळणारी सुट्टी आता नकोशी होते. 
     पण ठीकच आहे आयुष्यात बदल हे घडतच असतात आता वेळ असते आयुष्यभर जमा केलेली स्वप्न ,बरेच  छोटे छोटे क्षण जे कामाच्या व्यापात जगायचे राहून गेले होते ते जगण्याची. सकाळी उठण्यासाठी गजर  न लावता अंथरुणात थोडा वेळ, अजून थोडा वेळ लोळत पडण्याची. घरातील खूप गोष्टी ज्या आपल्याला आतापर्यंत माहीतच नव्हत्या त्या जाणून घ्यायची. आणि अत्यंत महत्वाच म्हणजे आपल्या तिला गजरा खूप आवडतो तो लपवून आणून अचानक तिच्या केसात माळायच राहूनच गेलं होतं. त्यानंतर तिला होणारा आनंद पाहायचा राहिलाय,  तिला तो आनंद देण्याची. नवनवीन जागी फिरायला जायच आहे. घरच्या गरजा मुलांचे लाड पुरवता पुरवता तिला एका अमुक ठिकाणी फिरायला घेऊन जायचं राहिलं आहे.आता वेळ आहे  तिच्या हक्काचा वेळ तिला देण्याची. 
एक असा, एक तसा ड्रेस खरेदी करून तो अंगावर चढवून मी यात कसा दिसतो हे पाहायचं होत. राहून गेलंय , हे सर्व राहून गेलंय . पण आता सेवानिवृत्ती नंतर हे सर्व करायचंय. अगदी मनभरून जगायचंय. वेळ भरून काढता येत नाही, पण अशाही काही गोष्टी असतात ज्याच्यासाठी ती ठराविक वेळ यावी लागते.
        आता काय करू म्हणून बसलो तर नवीन नवीन आजार मनात घर करायला लागतात. या सर्वाला फाट्यावर मारत ,अभी तो एक जमाना बाकी है ' म्हणत मनसोक्त जगायचं.

Second Innings Started.

"Happy Retirement Pappa"

Tuesday, 7 August 2018



तुझ्या माझ्या नात्याला नाव नको
लोकांच्या दूषित नजरा नको
अन बोचणारे नजरेचे वार नको
जिथे दोघांनाही जायचं नाही
तो रस्ता नको न तो गाव नको

लोक प्रेमाचा तोल मोल करतात
कोणाला खरं अन कोणाला खोटं ठरवतात
आपल्या भावनांना लुटण्यासाठी
लोकांनी लावलेला डाव नको
जिथे दोघांना जायचंच नाही
तो रस्ता नको न तो गाव नको

माहीत आहे लपत नसतात डोळ्यातील भावना
वाटत राहतं हलक्या व्हाव्या मनातील वेदना
मला छळणारे , विस्कटलेले, अव्यक्त,
ओसांडलेले भाव नको
जिथे दोघांना जायचंच नाही
तो रस्ता नको न तो गाव नको

© सरला चिमगावे 



Stay Home🏡 Stay Safe